प्राचार्य
प्राचार्यांचा संदेश.
डॉ. विकास विनायकराव सुकाळे, प्राचार्य, पीपल्स कॉलेज, नांदेड.
संदेश
प्राचार्यांचा संदेश.
दि. २६ जून १९५० रोजी युगपुरुष स्वामी रामानंद तीर्थ यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या पीपल्स कॉलेज, नांदेडच्या अमृत महोत्सवी वर्षाची यशस्वी पूर्तता झाल्यानंतर संस्थेच्या शैक्षणिक प्रवासाच्या ७६ व्या वर्षात पदार्पण करताना मला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो.
महाविद्यालयाच्या स्थापनेप्रसंगी स्वामीजींनी व्यक्त केलेले विचार आजही आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. समाजातील गरीब, शोषित, वंचित आणि सर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, त्यांच्यात ज्ञान, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण विकसित करणे तसेच त्यांना समाजसेवेसाठी सक्षम नागरिक म्हणून घडविणे हेच या महाविद्यालयाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्ट होते. गेल्या सात दशकांहून अधिक काळ पीपल्स कॉलेजने या ध्येयाशी प्रामाणिक राहून शिक्षणसेवेची गौरवशाली परंपरा जपली आहे. अशा उज्ज्वल परंपरा लाभलेल्या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून कार्य करण्याची संधी नांदेड एज्युकेशन सोसायटीने या शैक्षणिक वर्षापासून मला दिली, याबद्दल मी संस्थेचा मनःपूर्वक ऋणी आहे.
मराठवाड्यातील उच्च शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अग्रगण्य महाविद्यालयांपैकी एक म्हणून पीपल्स कॉलेजची ओळख आहे. कला व वाणिज्य शाखांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण उपलब्ध असून वाणिज्य शाखेत इंग्रजी माध्यमाची सुविधाही उपलब्ध आहे. मानवविज्ञान विद्याशाखेत बी.ए. तसेच एम.ए. स्तरावरील शिक्षणाची सोय असून मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत मराठी व इंग्रजी माध्यमातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. या बरोबरच महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र आहे असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची दूरस्थ शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
महाविद्यालयात मराठी, हिंदी, इंग्रजी, वाणिज्य, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांमध्ये मान्यताप्राप्त संशोधन केंद्रे कार्यरत असून पीएच.डी. संशोधनाची सुविधा उपलब्ध आहे. संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील अनुभवी प्राध्यापक संशोधन केंद्रांशी संलग्न आहेत.
महाविद्यालयाने केवळ पारंपरिक शिक्षणावर भर न देता बदलत्या काळानुसार कौशल्याधारित, रोजगाराभिमुख आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाचा स्वीकार केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, नवोपक्रमशीलता, उद्योजकता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी शिक्षण, प्रशासन, उद्योग, व्यवसाय, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून ते संस्थेच्या परंपरेचे सक्षम प्रतिनिधित्व करीत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे समाजाभिमुख कार्य, राष्ट्रीय छात्र सेना (NCC) मार्फत राष्ट्रसेवेची प्रेरणा तसेच सांस्कृतिक विभागामार्फत युवक महोत्सवांमध्ये मिळविलेले यश ही महाविद्यालयाची विशेष वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थ्यांसाठी समृद्ध ग्रंथसंपदा असलेले सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त वाचनालय तसेच अध्ययनास पूरक शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या संधींसाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे.
ज्ञान, मूल्ये, कौशल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. भविष्यातही उत्कृष्टता, गुणवत्ता आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण या मूल्यांच्या आधारे संस्थेची प्रगती अधिक उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. या माहितीपत्रकाच्या माध्यमातून महाविद्यालयाची ओळख आपणास करून देताना आम्हाला आनंद होत आहे. आपल्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी पीपल्स कॉलेज परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
डॉ. विकास विनायकराव सुकाळे, प्राचार्य
प्रवेश
तुमच्या आयुष्याचे पुढील प्रकरण येथून सुरू होते.
कनिष्ठ महाविद्यालयासह पदवीपूर्व, पदव्युत्तर, पदविका आणि संशोधन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. पात्रता, वेळापत्रक आणि कागदपत्रांसाठी मार्गदर्शन घ्या.